तुझे स्वप्न दिगंतात साकारु आम्ही पुन्हा!Mahanayak Editorial 14 April 2013
तुझे स्वप्न दिगंतात साकारु आम्ही पुन्हा!Mahanayak Editorial 14 April 2013
14 एपिल 1891 रोजी तू या जम्बुद्विपाच्या विशाल नभांगणात अवतीर्ण झालास. आणि आपल्या प्रखर तेजाने अवघे विश्व स्तिमीत करून गेलास. फुफाट्याच्या वहाणा तिन्हित्रिकाळ पायात घालून एका भीषण अंधारगर्भात गुडूप झालेली तुझी लेकरे, तू दावलेल्या प्रकाशाने तेजपुंज झालीत. गू-घाणीच्या रौरवात राबणारे हात, चामड्याच्या कर्दमात चेंदून गेलेली मने, गावकुसाबाहेर हुसकावलेले, रानोमाळ भटकंती करणारे, भिकार संस्कृतीच्या वरवंट्याखाली माणूसपण हरवून निशब्द झालेले या देशातील कोटी- कोटी जीव तू दिलेले शब्द घेऊन बोलके झाले. चेतलेली मने आणि पेटलेली माणसे अन्यायाच्या छाताडावर थयथय नाचू लागली. निष्ठुर न्यायाच्या वरंवट्याखाली दबून खिन्न झालेल्या चेहऱयावरची मरगळ तुझ्या प्रलंयकारी वाणीने झटकली गेली. आत्माविष्काराची तगमग सुरू झाली. समतेची प्रस्थापना करण्याची उर्मी बेलगाम होऊ लागली. पुर्वजांवरील अन्यायाच्या कहाण्या अंतकरणात अंगार फुलवू लागल्या. आया-बहिणीवरील अत्याचारांच्या घटनांनी मेंदु विदिर्ण व्हायला लागला. तुझी लेकरे एकीचे बळ जुळवून प्रतिकार करू लागली. गू-घाणीच्या रौरवात पिचलेली जिंदगी मुक्तीचा श्वास घेऊ लागली. गावकुसाबाहेर, खेड्यापाड्यात, गिरीकंदरात अवतीर्ण झालेले हे मुक्तीचे वादळ मानवी हक्काचे एकेएक दार उघडत बुद्धाच्या चिरंतन धम्माच्या विशाल महासागरात विलिन झाले. मनूने अवरुद्ध केलेले निळे आभाळ तू मोकळे करताच तुझी मुले सुसाट धावत सुटली. बामणाघरच्या लिवण्याला आपलंसं करून सामर्थ्यशाली झाली. या सामर्थ्यातून काही जणांना संपन्नताही लाभली. तुझ्या संपन्न लेकरांकडून आपल्या बांधवांना प्रकाशाचे काही कण वाटले जावेत, अशी तुझी अपेक्षा होती. पण या संपन्नता प्रप्त केलेल्या झुंडीने आपल्या सुखासिनतेचा जराही त्याग न करता तुझी अपेक्षा फोल ठरविली. तू आमच्यापुढे ठेवेलेल्या स्वप्नांना आकार देण्याची कुवत तुझ्यानंतर कोणातही निर्माण होऊ शकली नाही. तुझ्या लेकरांना राजा बनविण्याच्या तुझ्या स्वप्नांची हजार शकले झाली. अखिल जम्बुद्विपात `बुद्धम् सरणं गच्छामी'चा घोष दुमदुमावा, या तुझ्या प्रतिज्ञेवर आमच्या नाकर्तेपणाच्या धुळीची पुटे चढली. तू चेतविलेली मने पुन्हा खिन्न आणि विपन्न होऊन विझत गेली. आता तुझा जयघोष सुरु झाला! आमचे तलवारी बनलेले हात सत्ताधिशांच्या शेपटाखाली म्यान झाले. तुझ्या नावाचा उच्चारवात जयघोष करणारे तुला सोयीस्करपणे आपल्या दुकानात टांगून आपली दुकानदारी करू लागले. हे ठेकेदार, हे दुकानदार देशाच्या कानाकोपऱयात पसरलेल्या तुझ्या लेकरांचा, दर पाच वर्षांनी लिलाव करण्यासाठी वेगवेगळ्या नावाची दुकाने थाटवून बापू-गुरुजींच्या नातवा-पणतवंडांच्या घराचे उंबरठे झिजवू लागले. लोकशाही मार्गाने कांती करून समतेचे राज्य प्रस्थापित करण्याची तुझी चळवळ तुझ्यानंतर तुझ्या दिग्गज सहकाऱयांनी व त्यानंतर काँग्रेसने खतपाणी घालून वाढविलेल्या उपटसुंभ नेत्यांनी उद्ध्वस्त केली. या उपटसंभु नेत्यांभोवती झिम्मा-फुगडी घालणाऱया विहारात बौद्ध व कचेरीत महार असणाऱया नोकरशहांनी व गल्लीबोळातील भटक्या म्होरक्यांनी तुझ्या चळवळीला आज मातीमोल केले आहे.
महामानवा, या भीषण अंधारनाट्याने भयकंपित झालेल्या मृतपाय मनावर तुझ्या युगप्रवर्तक विचाराचे अभिसिंचन करून एक नवी उभारी देणारी काही वेडी मुले निपजली. तू दिलेल्या उदात्त जीवनमूल्याचा संस्कार उद्ध्वस्त मानवतेवर करून या संस्कारातून सामर्थ्य वाढविण्याचा त्यांनी चंग बांधला. या सामर्थ्यांच्या जोरावर आम्ही पुन्हा मुसंडी मारली. अडखळलो, ठेचाळलो, पण रक्ताळलेल्या पावलांनी चालत राहिलो...! `अब तो हमारी बारी है। दिल्ली की दावेदारी है।' म्हणत काँग्रेसी अस्मान आणि भगवे स्मशान भेदून काढत ही रक्ताळलेली पावले पुन्हा राजपथाच्या दिशेने चालू लागली. वाटले होते तू पाहिलेल्या स्वप्नांना आता आकार येणार. ऋषीमुनींच्या आर्यावर्तात `बुद्धम् सरणं गच्छामी'चा घोष घुमणार. परंतु पुन्हा एकदा आमच्या गाफीलपणाने प्रश्नांचे पहाड नेस्तनाबूत करणाऱया कांतीला जानव्याच्या जंजाळात गुरफटुन टाकले आहे. तुझ्या संघर्षाच्या तेजःपुंज वाटा काही भामट्यांनी अवरूध्द केल्या आहेत. त्यांनी तुझ्या युगपवर्तक अस्तित्वावर भरजरी महावस्त्र झाकली आहेत. तू आता भक्तीचा विषय झाला आहेस. युगाचा आकांत थोपविण्यासाठी तू उभे केलेले विचाराचे खांब आता थरथरू लागले आहेत. स्वार्थपेरीत झालेली मने अस्तित्वासाठी भगवे तिरंगे आधार शोधायाला बुभूक्षितपणे बाहेर पडली आहेत. तुझ्याभोवती जमा झालेला हा बुभूक्षितांचा कळप पाहून जीव आता शरमेने काळवंडून येतो. उत्साही श्वासांचे उगम आता सैरभैर झालेले आहेत. फसव्या टारगटांनी केलेल्या रोषणाईत आमचा बाप हरवून जातो की काय या शंकेचे ढग मन विषण्ण करतात. लुटारू बडव्यांनी उभारलेल्या कमानीच्या आड संघर्षाची अक्षरे दडपून टाकण्याची शिकस्त करण्यात येत आहे. उनाड भामट्यांनी उभारलेल्या सभामंचावर परिवर्तनाची मयसभा उभी करणाऱया प्रच्छन्न धम्मोध्दारकांनी आमच्या बापाला आता घेरले आहे. तुझ्या स्वप्नांना आकार येऊन तुझ्या लेकरांची पाऊले राजपथावर पडण्याची अंधुकशी आशा विदीर्ण करण्यासाठी मनुचे वंशज पुन्हा सकिय झाले आहेत. तरीही आम्ही निराश झालेलो नाही. मळभ दाटलेल्या या मलूल वर्तमानाला धक्का देण्याची तयारी आता पुन्हा नव्या जोमाने करतो आहोत. हे खरे आहे की, विध्वंसक वणव्यांच्या ठेकेदारांनी आमच्या मार्गात असंख्य ज्वाळा उभ्या केल्या आहेत. या ज्वाळांच्या मायावी उजेडात लखलखीत झालेल्या रात्रीचा उत्सव साजरा करून कसे चालेल? कभिन्न धुक्यात हरवून गेलेली तुझ्या महाकारूणिक वात्सल्याची आरती पुन्हा गाऊन म्लान झालेले आभाळ आम्ही पुन्हा तेजोयमान करणार! तुझ्या विचाराचे विराट कांतीधनुष्य घेऊन अवरूध्द वर्तमानाला खिंडार पाडण्याची तयारी आता केलीच पाहिजे. हे ठिक आहे की, कांतीची आरती गाणारे काही महारथी अधःपतित झाले असतील! हे ठिक आहे की, निष्पाण बुबुळांना पकाशाचा मार्ग दावण्याची घोर प्रतिज्ञा करणाऱया विद्रोही शलाका अर्थराजाच्या शय्येवर रखेल होऊन पडल्या असतील! म्हणून परिवर्तनाची लढाई मध्येच सोडून द्यायची नसते. तुझ्या प्रतिच्या अपार कृतज्ञतेने ओथंबलेल्या या जनसागराला एक नवी उमेद देऊन त्यांच्या सुख दुःखाचे वाटेकरी बनण्यासाठी एक नवा स्वाभिमानी पवाह पुन्हा गतिमान करण्याची आम्ही शिकस्त करतो आहोत. या देशाचे पारब्ध ठरविण्यासाठी तू अभिलिखीत केलेला दस्तावेज निष्पभ करण्याची अभिलाषा बाळगणाऱया मनुभक्तांना चैत्यभूमीच्या पायरीखाली दफन करण्यासाठी एक विशाल आंदोलन उभे करुन तुझ्या संघर्षाला नव्याने उभारी देण्याची तयारी तुझ्या जयंतीदिनी करणे म्हणजेच सामर्थ्यशाली नव्या भारताची निर्मिती करणे ठरेल. ही तयारी आपण सर्वांनी निर्धारपूर्वक करुया!
आम्ही तुझ्या संगरात प्राण फुंकले पुन्हा,
तुझे स्वप्न दिगंतात साकारू आम्ही पुन्हा I
आम्ही उजळू दिशा-दिशा पुन्हा एकदा,
तुझेच शौर्य आमच्यातही उफाळू दे ।।
जय भिम!
No comments:
Post a Comment